भारतातील लक्झरी हॉटेल्समध्ये एकेकाळी बाथरूममधील टॉयलेट्री उत्पादने ही बहुतेक आयात केलेली, सर्वसाधारण आणि ब्रँड म्हणून ओळख नसलेली असायची. हीच बाब २०१२ साली इंदोर येथील रजत जैन आणि मोहित जैन या भावंडांनी हेरली आणि त्यातूनच Kimirica (किमिरिका) या ब्रँडचा जन्म झाला.
त्या काळात बहुतेक फाईव्ह-स्टार हॉटेल्स चीन किंवा इतर देशांमधून आयात केलेली उत्पादने वापरत होती. भारतातच दर्जेदार, पर्यावरणपूरक आणि भारतीय ओळख असलेली लक्झरी उत्पादने का तयार होऊ शकत नाहीत? या विचाराने जैन बंधूंनी आयुर्वेद, नैसर्गिक घटक, व्हेगन आणि क्रुएल्टी-फ्री संकल्पनेवर आधारित उत्पादनांची दिशा ठरवली. मोठी भांडवलशक्ती नसतानाही त्यांनी एका छोट्या बँक कर्जावर आणि कुटुंबाची मालमत्ता गहाण ठेवून छोट्याशा जागेत हाताने साबण तयार करण्यास सुरुवात केली.
किमिरिका ची खरी ताकद ठरली ती कस्टमायझेशन. प्रत्येक हॉटेलसाठी खास सुगंध, वेगळं पॅकेजिंग आणि हॉटेलच्या लोगोप्रमाणे डिझाइन केलेली उत्पादने त्यांनी तयार केली. ही संकल्पना हॉटेल इंडस्ट्रीमध्ये वेगळी ठरली. सातत्याने प्रयत्न केल्यानंतर मॅरिएट ग्रुप कडून मिळालेली पहिली मोठी ऑर्डर किमिरिका साठी निर्णायक ठरली. त्यानंतर हयात हिल्टन यांसारख्या आंतरराष्ट्रीय हॉटेल्स सोबत देखील त्यांची भागीदारी झाली.
२०१७ मध्ये किमिरिका ने कॅनडाच्या हंटर एमेनिटीज सोबत भागीदारी करत किमिरिका हंटर या संयुक्त उपक्रमाची स्थापना केली. यामुळे उत्पादनक्षमता, वितरण आणि जागतिक बाजारपेठेत प्रवेश सुलभ झाला. पुढे त्यांनी किमिरिका लाईफ स्टाईल या रिटेल ब्रँडद्वारे व्हेगन स्किनकेअर आणि लाइफस्टाइल उत्पादने ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली. अभिनेत्री कियारा अडवाणी या ब्रँडची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. आज किमिरिका भारतातील सुमारे ७० टक्के टॉप लक्झरी हॉटेल्सना टॉयलेट्री पुरवते. कंपनीचा टर्नओव्हर ४०० कोटींच्या पुढे गेला असून अमेरिका, मध्य पूर्व आणि एअरलाईन्स क्षेत्रात विस्तार करत ५०० कोटींचं लक्ष्य गाठण्याच्या दिशेने किमिरिका वाटचाल करत आहे. ही कहाणी म्हणजे भारतीय उद्योजकतेच्या जिद्दीची आणि स्वदेशी विचारांची प्रेरणादायी साक्ष आहे.