२०१५ साली भारतातील फूड-स्टार्टअप्सच्या स्पर्धेत एक वेगळा प्रयोग जन्माला आला, Biryani By Kilo (BBK). ताजी, दम बिर्याणी ग्राहकांच्या दारापर्यंत पोहोचवण्याच्या अनोख्या संकल्पनेमुळे बीबीके ने अल्पावधीतच देशभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली. या स्टार्टअपची स्थापना विशाल जिंदल, कौशिक रॉय आणि रितेश सिन्हा यांनी केली.
BBKची सुरुवात पारंपरिक रेस्टॉरंट मॉडेलपासून पूर्णपणे वेगळी होती. संस्थापकांनी ‘क्लाउड-किचन + डिलिव्हरी ‘ या तंत्रज्ञानाधारित पद्धतीचा पर्याय निवडला. येथे प्रत्येक ऑर्डरसाठी बिर्याणी ताजी, दम-शिजवून हंडी मध्ये तयार केली जाते. हा ‘Made-to-order’ मॉडेल BBKच्या ब्रँडची मोठी जमेची बाजू ठरला. हैदराबादी बिर्याणी, लखनवी बिर्याणी, कोलकाता बिर्याणी यांसारख्या ४–५ प्रमुख बिर्याणी स्टाईल उपलब्ध असणारी ही सेवा ग्राहकांना अत्यंत आवडली.
पहिल्याच काही वर्षांत BBKला मोठा ग्राहकवर्ग लाभला. ऑनलाइन ऑर्डर्सची वाढ, ताज्या अन्नाची हमी आणि सातत्यपूर्ण चव यामुळे ब्रँडने देशभरात मुळे रोवण्यास सुरुवात केली. काही वर्षांत BBK ने दिल्ली-NCR, मुंबई आणि इतर महानगरांत विस्तार करत ४५+ शहरांत १०० पेक्षा जास्त आउटलेट्स उभारत आपली उपस्थिती मजबूत केली. फ्रँचायझी मॉडेल आणि क्लाउड-किचन रणनीतीमुळे त्यांचा विस्तार खर्च कमी राहिला आणि पोहोच मोठ्या प्रमाणात वाढली.
आर्थिकदृष्ट्या २०२४ हे वर्ष BBKसाठी महत्त्वाचं होतं. कंपनीने ₹२६८ कोटींचा महसूल मिळवत 22.9% वाढ नोंदवली. नुकसानीतही सुधारणा करत त्यांचा निव्वळ तोटा ₹१०१ कोटींवरून ₹७१ कोटींवर आला. आजपर्यंत BBK ने सुमारे $५४–५५ मिलियन इतका निधी उभारला असून कंपनीची बाजारातील स्थिती आणखीन मजबूत केली आहे. गुणवत्ता, तंत्रज्ञान आणि स्पष्ट व्यवसाय रणनीती यांच्या जोरावर एक साधा भारतीय खाद्यपदार्थ बिर्याणी देखील देशव्यापी, शेकडो कोटींचा व्यवसाय बनू शकतो, हे बीबीके ने दाखवून दिले आहे.