केन्यामधील वाढत्या प्लास्टिक प्रदूषणाला रोखण्यासाठी एक तरुणी पुढे आली आणि तिच्या कल्पकतेने जगाचे लक्ष वेधले. नझाम्बी माटी यांनी स्थापन केलेले ग्जेन्गे मेकर्स हे स्टार्टअप आज आफ्रिकेतील सर्वात उल्लेखनीय पर्यावरणपूरक उपक्रमांपैकी एक मानले जाते. प्लास्टिकच्या कचऱ्याचे संकलन करून त्याला अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे पुनर्प्रक्रिया करणे आणि त्यातून मजबूत, किफायतशीर विटा तयार करणे, ही या कंपनीची प्रमुख कामगिरी आहे.
ग्जेन्गे मेकर्सच्या या विटांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची मजबुती. कंपनीच्या मते, या विटा पारंपरिक काँक्रीटपेक्षा 5 ते 7 पट अधिक मजबूत असून, त्यांना जलरोधक (वॉटरप्रूफ) आणि दीर्घायुषी बनवणारी विशेष प्रक्रिया वापरली जाते. कमी किमतीत मिळणाऱ्या या विटा घरबांधणी, रस्त्यांच्या पाथवे, उद्यानांच्या लँडस्केपिंगसह अनेक बांधकामांसाठी उपयुक्त ठरत आहेत. कचऱ्याचा पुनर्वापर करताना उच्च गुणवत्तेचे साहित्य बाजारात आणणे हे या कंपनीचे वैशिठ्य आहे.
नझाम्बी माटी यांचा हा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. समुद्रकिनारी वाढत्या प्लास्टिक ढिगाऱ्यांनी निर्माण केलेल्या पर्यावरणीय संकटाने त्यांना अस्वस्थ केले आणि त्यातूनच या उपक्रमाची बीजं पेरली गेली. अभियांत्रिकी पार्श्वभूमी असलेल्या माटी यांनी स्वतः प्रयोग करून प्लास्टिक मिश्रणाचे फॉर्म्युले विकसित केले आणि कमी साधनसामग्रीतही त्यातून टिकाऊ विटा तयार करण्याचे तंत्र शोधले.
आज ग्जेन्गे मेकर्स केवळ प्लास्टिक प्रदूषण रोखण्यातच नाही, तर स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यातही मोठे योगदान देत आहे. कचरा व्यवस्थापन, पुनर्प्रक्रिया आणि हरित बांधकाम उद्योगांना चालना देणारा हा उपक्रम भविष्यातील पर्यावरणपूरक शहरांची पायाभरणी करत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.